मी नजरेला, खास नेमले
मी नजरेला, खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटते, ती भिरभिरते, तुला पाहण्यासाठी
म्हणून तू, जाहलीस माझी, माझी, केवळ माझी
किती बहाणे, केले होते, तुला टाळण्यासाठी
घडीभराने, मलूल होतो, गजरा वेणीमधला
खरे सांगतो, खरेच घे हे, ह्रदय माळण्यासाठी
गुपचुप येउन भेटत असते, तुझी आठवण मजला
तिचा दिलासा, मला पुरेसा, आहे जगण्यासाठी
कधी कवडसा, बनून यावे, तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची, मला पकडण्यासाठी
तू म्हणजे गं, फूल उमलते, गंध तुझा मी व्हावे
दवबिंदू, व्हावेसे वाटे, तुला स्पर्शिण्यासाठी
तुझी साधना, करता करता, अखेर साधू झालो
निर्मोही, जाहला `इलाही', तुला मिळविण्यासाठी
|